Friday, February 4, 2011

आदित्य ठाकरेंच्या "लॉंचिंग'ची अतिघाई...

ठाकरेंच्या तिसऱ्या पिढीला सेनापती करण्याची घाई दुसऱ्या पिढीला जेवढी झाली, तेवढीच घाई तिसऱ्या पिढीलाही आपले कर्तृत्व दाखविण्यासाठी झालेली दिसते; अन्यथा स्वतःचे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण होण्याआधीच भारतीय विद्यार्थी सेना बरखास्त करून ती आपल्या युवा सेनेत विलीन करून टाकण्याची घाई नवे सेनापती आदित्य ठाकरे यांना झाली नसती. पोरवयात अशा गफलती होत असतातच. गुरुवारच्या शिवसेना भवनात झालेल्या बैठकीत आपला मनसुबा नव्या सेनापतींनी चुकून उच्चारला आणि पूर्ण शिवसेनेत आणखी एक पेल्यातील वादळ जन्माला आले. नमनालाच बाळराजांना अशा वादळांना सामोरे जावे लागू नये म्हणून कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी घाईघाईने सारवासारव केली, प्रसिद्धिमाध्यमांपर्यंत संदेश पोचवले आणि भारतीय विद्यार्थी सेनेचे अस्तित्व संपलेले नाही, अशी ग्वाही दिली. खुद्द "मातोश्री'वरून खुलासा झाला असला, तरी हा खुलासा म्हणजे वादळ तात्पुरते शमविण्यासाठी केलेली तजवीज आहे, हे शिवसेनेत सगळेच जाणून आहेत. त्यामुळे कार्याध्यक्षांचा खुलासा जाहीर झाल्यानंतरही "विद्यार्थी सेनेला तात्पुरते जीवदान मिळाले,' अशीच सार्वत्रिक प्रतिक्रिया उमटली. शिवसेनेने आपल्या संघटना किंवा उपक्रम विसर्जित करणे किंवा ते हळूहळू गतप्राण होणे काही नवे नाही. यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी सुरू केलेल्या "मी मुंबईकर' उपक्रमाचे त्यांनाच विस्मरण झाले असेल. "शिवान्न' उपक्रमाची दुकाने तर काही दिवसांतच शटरबंद झाली. "अवनि (अन्न-वस्त्र-निवारा) ट्रस्ट'चे एक खाद्यान्न केंद्र दादरला सुरू झाले. ते आता कोणाच्या हाती आहे, याचे जिज्ञासूंनी संशोधन करायला हवे. सर्वच राजकीय किंवा सामाजिक उपक्रम, कल्पना समाजाकडून स्वीकारल्या जातात, असे नाही. समाजाने न स्वीकारलेल्या गोष्टी राजकीय पक्षांना सोडून द्याव्या लागतात. त्यात काही चूक नाही; पण भारतीय विद्यार्थी सेना गेली चाळीस वर्षे विद्यार्थी जगतामध्ये आपला दबदबा राखून होती. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, "स्टुडंट्‌स फेडरेशन ऑफ इंडिया', छात्रभारती, "नॅशनल स्टुडंट्‌स युनियन ऑफ इंडिया' यांसारख्या प्रमुख विद्यार्थी संघटनांपैकी आघाडीवरील संघटना होती. मुंबईतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचे प्रश्‍न, एखाद्या संस्थेचे गैरव्यवस्थापन किंवा अधिसभा, या प्रत्येक ठिकाणी विद्यार्थी सेनेचा दबदबा होता. जे नाव विद्यार्थी आणि तरुणांच्या ओठावर आहे ते मागे सारून "युवा सेना' अधिक महत्त्वाची आणि लोकप्रिय करण्यासाठी शिवसेनेच्या नेतृत्वाने भारतीय विद्यार्थी सेना त्यात विलीन करण्याचा निर्णय घेतलेला दिसतो. कालपर्यंत भारतीय विद्यार्थी सेना आणि राज ठाकरे हे समीकरण होते. शिवसेना सोडल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन करताना राज यांना भारतीय विद्यार्थी सेनेतूनच कुमक मिळाली होती. विद्यार्थी सेनेतून मोठा गट "मनसे'त जाऊनही ती अबाधित राहिली. ज्यांनी तिचे अस्तित्व मोठ्या जिद्दीने आणि कष्टांनी जिवंत ठेवले, त्यांनाही विद्यार्थी सेना विलीन करण्याच्या निर्णया वेळी विश्‍वासात घेतले नाही, अशी जोरदार तक्रार आहे. युवा सेना स्थापन करून ती आदित्य ठाकरे यांच्या हाती देण्याचा निर्णय काही अचानक झालेला नाही. आदित्य यांची प्रतिमा वेगवेगळ्या खर्चिक "इव्हेंट'द्वारे व्यवस्थित तयार केली गेली होती. दसरा मेळाव्यानिमित्ताने त्यांचे योजनाबद्ध "लॉंचिंग' केले गेले. शिवसेनाप्रमुखांनी दसरा मेळाव्यातच आदित्य यांचे धाकटे बंधू तेजस यांच्याही राजकारण प्रवेशाचे संकेत दिले आहेत. मुंबईत फिरणाऱ्या "एसएमएस'मध्ये या सेनेचे नाव "चिऊसेना' असे केले गेले आहे!

No comments:

Post a Comment